माणसांना स्वप्न पहायला शिकवणारा माणूस.. धीरूभाई अंबानी

                    धीरजलाल हिरालाल अंबानी

                    रिलायन्स उद्योगाचे संस्थापक
                                                                      

                 जन्मदिनांक : २८ डिसेंबर १९३२
                 मृत्युदिनांक  : ६ जुलै २००२
                 जन्मस्थळ   :  जुनागढ , चोरवाड (गुजरात)
                 मृत्युस्थळ    : मुंबई 

माणूस गरीब घरात जन्माला आला तरी स्वतःच्या कर्तुत्वाने तो एक श्रीमंत माणूस म्हणून आपली ओळख निर्माण करू शकतो हे सिद्ध करणारं एक व्यक्तिमत्त्व याचं भारतात जन्माला आलं. एकेकाळी ३०० रुपये महिना पगारावर काम हा माणूस आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर रिलायन्स उद्योगाचा सर्वेसर्वा झाला. त्या व्यक्तीच नावं होत धीरजलाल हिरालाल अंबानी म्हणजेच धीरूभाई अंबानी..

२८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील जुनागढ येथे धीरूभाईंचा जन्म झाला. वडील हिराचंद आणि आई जमनाबेन यांच्या पोटी जन्मलेले धीरूभाई एका सामान्य कुटुंबात जन्माला आले होते. परंतु त्यांची स्वप्न कधीच सामान्य नव्हती आणि ज्या माणसांची स्वप्न सामान्य नसतात तीचं माणसं असामान्य असतात. सन १९४९ मध्ये धीरूभाईंनी मॅट्रिकपर्यंत आपले शिक्षण पुर्ण केले. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे एडनमध्ये जावुन त्यांना पेट्रोल पंपावर नोकरी करावी लागली. त्या पेट्रोल पंपावरूनही त्यांना हाकलून दिलं गेलं. येथुनच सुरू झाला प्रवास एका सामान्याचा असामान्यपर्यंतचा..

एडनमध्ये धीरूभाईंनी फळे , गुजराती खाद्यपदार्थ विकायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना यशही मिळू लागले. अशातच सन १९५१ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. पण धीरूभाईंनी आपली जिद्द सोडली नाही. सन १९५४ साली एडनमध्येच त्यांचा विवाह कोकीलाबेन यांच्याशी झाला. दुसऱ्याची गुलामी केल्यापेक्षा स्वतःच अस्तित्व निर्माण करावं या विचारधारेचे पुजारी धीरूभाईं आपल्या कुटुंबाला घेवून भारतात आले. 

सन १९५७ साली मुकेश तर सन १९५८ साली अनिल अशा दोन मुलांचा जन्म झाला व त्यांच्यापाठोपाठच दोन मुलींचाही जन्म झाला. स्वतःचा कारखाना उभारण्यासाठी त्यांनी बँकांकडे कर्जाची मागणी केली पण बँकांनी साफ नकार दिल्यामुळे त्यांनी जनतेतूनच पैसा उभारायला सुरुवात केली. आणि सन १५५९ साली धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स उद्योगाची स्थापना केली. पाहता-पाहता त्याच जाळ सगळीकडे पसरू लागलं म्हणून सन १९८६ साली ९०० कोटी रुपयांच्या रिलायन्सचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

पुढे दहा वर्षात म्हणजेच सन १९९६ पर्यंत याच रिलायन्सची उलाढाल ७८०० कोटींच्या घरात येवुन पोहचली. सन २००० साली रिलायन्सने २५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली. २० व्या शतकातील साहसी पुरुष म्हणून धीरूभाई अंबानी यांचा गौरव करण्यात आला. शेवटी ६ जुलै २००२ रोजी पक्षघाताच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

धीरूभाई तर या जगातून गेले पण जणू सर्व जगाला सांगून गेले की माणसाने स्वप्न पहिली पाहिजे. कारण ज्यांच्या डोळ्यासमोर स्वप्न असतात ती माणसं स्वप्नांचा पाठलाग करतात. पण ज्यांची काही स्वप्नच नसतात ती माणसं मात्र साचलेल्या डबक्यासारखी असतात.

- प्रतिक गणेश महल्ले 

फोटो श्रेय - साभार गूगल