राजा म्हटलं की तीन ' स ' च समीकरण ठरलेलं. सत्ता , संपत्ती आणि सन्मान परंतु या जगाच्या पाठीवरती माझा बाप असा एकमेव राजा आहे ज्याच्याकडे या तीन पैकी एकही गोष्ट नाही . तरी त्याला बळीराजा म्हणुन हिणवलं जातं .
जन्मापासुनच कष्ट आणि माझ्या बापाचं घनिष्ट नातं आहे. रविवार हा फक्त आमच्या स्वप्नातच असतो कारण माझ्या बापाला कुठल्याचं दिवशी सुट्टी नसते . दिवस रात्र शेतात राब-राब राबायचं, रक्ताचा घाम गाळुन सोन्यासारखं पीक उभं करायचं आणि जेव्हा त्या पिकाचा मोबदला मिळवण्याची वेळ येते तेव्हा मात्र हमीभाव मिळत नाही . आंबा आमच्या शेतात पिकतो त्याचा रस मात्र विदेशात गळतो . आमच्याच टमाटरचा सॉईस बनवल्या जातो पण त्याचं टमाटरला योग्य दर न मिळाल्याने आत्महत्येशिवाय दुसरा कुठला चॉईस माझ्या बापाकडे उरत नाही . तरीही इथली व्यवस्था त्याच्या जगण्याला हिम्मत देत नाही मात्र त्याच्या मरणाला एक लाख रुपये किंमत देते .
या देशात कुंभार मातीची मडकी घडवितो तेव्हा त्या मडक्याचा भाव ठरविण्याचा अधिकार त्या कुंभाराला असतो . चांभार ज्या वेळेला चप्पल बनवितो तेव्हा बनविलेल्या चप्पलीचा दर ठरविण्याचा अधिकार चांभाराला असतो . परंतु काळ्या मातीशी जुगार खेळणाऱ्या शेतकऱ्याला मात्र त्याने स्वतः पिकवलेल्या शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही . मग तुम्हीच सांगा ना माझ्या शेतकरी बापानं जगायचं की मरायचं...
जगाला पोसता-पोसता एका दाण्याचे हजार दाणे करण्याच्या नादात माझा बाप एका रुपयाचे हजार रुपये करने विसरला आणि इथेच त्याचा घात झाला . 2005 साली एस. एम स्वामिनाथन समितीने स्वामिनाथन आयोग मांडला ज्याची महत्वपुर्ण अट म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला दिडपट भाव द्या . दिडपट भाव तर सोडाच पण शेतीचा खर्च निघण्याइतपतही भाव मिळाला नाही.
Ac हॉलमध्ये बसुन ... शेतात उन्हा-तान्हात तापणाऱ्या आणि पोटाची खळगी भरणाऱ्या माझ्या शेतकरी बापाची कथा आणि व्यथा इथल्या व्यवस्थेला काय कळणार ... मध्यंतरी शेतकऱ्यांसाठी काही योजना आल्या पण यामध्येही इतरांचाच फायदा जास्त झाला . ते म्हनतात ना ' अपना काम बनता तो भाड मे जाये जनता '..
हे संघर्षचक्र संपत नाही तर दुष्काळासारखी समस्या काळासारखी समोर उभी राहते . दुष्काळ ओला असो की कोरडा त्याची झळ माझ्या बापालाच पोहचते . या देशातील श्रीमंत लोक ओला दुष्काळ पडला तर गरमीच्या ठिकाणी आणि कोरडा दुष्काळ पडला तर थंडीच्या ठिकाणी जाण्याचं प्लॅनिंग करत असतांना माझा बाप प्लॅनिंग करत असतो भविष्यात कसं जगायचं याच... सध्या असलेल्या ओल्या दुष्काळामध्ये सर्वात जास्त नुकसान कुणाचं झालं असेल तर ते झालंय माझ्या शेतकरी बापाचं ... पोटच्या पोरासारखं पिकाला वाढवुन तोंडाशी आलेला घास ऐनवेळी निसर्ग हिसकावुन नेतोय .
- पाणी कस जीवघेणं ठरतंय. नक्की वाचा
- जिवदान देणारं पाणीच ठरतंय जीवघेणं
' कागदाच जहाज तयार करून त्याला पाण्यात तरंगतांना पाहण्याएवढं सोपं नाही मेहनतीने वाढवलेल्या पिकाला पाण्यात तरंगतांना पाहणं '.. अशा काळात फक्त ढग दाटून येत नाहीत तर दाटून येत माझ्या बापाचं भविष्य , विजांचा कडकडाट जरी आभाळात होत असला तरी कडकणाऱ्या प्रत्येक विजेचा आघात मात्र माझ्या बापाच्या काळजावर होत असतो . आणि बरसणाऱ्या पावसाच्या प्रत्येक सरीबरोबर बरसत राहतो त्याच्या डोळ्यातील अश्रुचा थेंब अन थेंब .... पण एवढं सगळं होवुनही पुन्हा नव्या उमेदीने जगायला काळीज हे माझ्या शेतकरी बापाचचं असावं लागतं .
एखादया नैसर्गिक आपत्तीनंतर प्रत्येक जण म्हणतो की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत . परंतु जी माणसं पाठीशी उभी असतात त्या माणसांना समोरच्या व्यक्तीचा चेहरा आणि त्या चेहऱ्यावरील दुःख कधीच दिसत नाही . म्हणुन आता माझ्या शेतकरी बापाच्या पाठीशी नाही तर सोबत उभं राहुन त्याची व्यथा जाणुन घेण्याची गरज आहे . कारण
'माझा बाप शेतकरी , उभ्या जगाचा पोशिंदा'...
- समाप्त
प्रतिक महल्ले
Photo Credit - Pixabay
8 Comments
खूप छान, वास्तव!
उत्तर द्याहटवाThank you
हटवाखूपच सुंदर लिहिलंय 🌺👏🏻👌🏻
उत्तर द्याहटवाThank you
हटवाअप्रतिम प्रतीक भाऊ 💐💐
उत्तर द्याहटवाThank you
हटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाThank you
हटवाटिप्पणी पोस्ट करा