14 फेब्रुवारी 2019 चा तो दिवस होता. सकाळी सूर्य उगवला. चैतन्याचं वातावरण होतं. कारण 14 फेब्रुवारी म्हटलं की तरूणाईसाठी प्रेमाचा दिवस... सगळीकडे प्रेमाची उधळण होत असतांना काश्मीरमध्ये येणार्या संकटाची आस मात्र कुणालाच भासत नव्हती. नव्हे नव्हे तर काश्मीरची थंडी ती भासु देत नव्हती. पाहता पाहता दुपार उलटून गेली. अशातच जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सीआरपीएफच्या 78 बस जवळपास 2500 जवानांना घेवुन पुलवामा कडे मार्गक्रमण करत होत्या. शंका घेण्यासारखी गोष्टचं नव्हती. गप्पा रंगात आल्या होत्या. कुणी एकजण सांगायला लागलं. अरे , काही दिवसांपूर्वी घरी गेलो होतो. तब्बल एक वर्षानंतर माझ्या आई वडिलांना मी पाहिलं. माझी आई माझ्या काळजीपोटी सुकुन गेली रे.... मध्यंतरी तिला दम्याचाही त्रास सुरू झाला. एवढ्यावर शब्द थांबले आणि डोळ्यांमध्ये अश्रू दाटुन आले.
अशातच दुसरं कोणीतरी सांगायला लागलं. हो रे , काही दिवसांपूर्वी ताईचा पण फोन आला होता. ती सांगत होती... दोन वर्ष झाली रक्षाबंधनाला तू घरीच आला नाहीस. यावेळेला जर तू आला नाहीस तर आपलं नातं तुटलं म्हणून समज.. एवढ्यातच त्याला थांबवत तिसरा एक जण सांगायला लागला अरे , तुम्हाला सांगायच राहुनच गेलं. आठ दिवस झाले मला मुलगा झाला. असं वाटतं त्याला कधी पाहावं अन कधी नाही. पण एक मात्र खरं मी माझ्या पोराला देशसेवेकरिताच अर्पण करणार ... पाहता-पाहता दुपार उलटुन गेली. सगळं काही ठीक चाललं होत. पण नियतीच्या मनात वेगळंच होत. अचानक रस्त्याच्या दुसऱ्या कडेवरून भरधाव दिशी येत विस्फोटकांनी भरलेल्या एका कार ने या जवानांच्या गाड्यांना धडक दिली. काही कळायच्या आतच प्रचंड मोठा स्फोट झाला. रक्ताचा सडा-सडा जमिनीवर पडला होता. कोण कुणाचा बाप , कोण कुणाचा पती, कोण कुणाचा मुलगा काहीच कळत नव्हतं. क्षणात सर्व उध्वस्त झालं. कित्येक परिवारांची स्वप्न नष्ट झाली. आजही पुलवामा हमला म्हटलं तरी अंगावर काटा उभा राहतो. ते वीर शाहिद झाले. पण कुणासाठी? तुमच्या माझ्यासाठी या देशातील प्रत्येक नागरिकासाठी..
इकडे तुम्ही आम्ही खुशाल सण साजरे करत असतांना ते मात्र सीमेवर डोक्याला कफन बांधून जगत असतात. आपली धडपड असते ती जगण्यासाठी पण त्यांची धडपड असते ती देशसेवा करत देशासाठी वीरमरण पत्करण्यासाठी. बाल्या , बाल्याची माय बाली अन दहा बाय दहाची खोली याच्या पलीकडे आपलं विश्वचं नाही. पण जी माणसं स्वतःच्या आणि परिवाराच्या पलीकडे जावुन देशाचा विचार करतात ना ती माणसं खूप ग्रेट असतात. काय दातृत्व असेल त्या मायबापांच जे आपला एकुलता एक पोरगा देशसेवेसाठी पाठवतात. खरा देशभक्त तोच आहे जो सगळे अन्याय सहन करेल पण मातृभूमीवर झालेला अन्याय मात्र कधीच सहन करणार नाही. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी खिशाला राष्ट्रध्वज लावुन गावभर फिरण्याएवढं सोपं नाही देशासाठी शहीद होणं.
एक दिवस आई-वडिलांना सीमेवर असणाऱ्या आपल्या मुलाचा फोन आला की मी पाच दिवसांनी घरी येतोय. हे ऐकताच घराच आनंदाला पारावार नव्हता. हर्ष-उल्हासाने वातावरण दाटुन गेलं होतं. पत्नी स्वप्न रंगवायला लागली. आई मुलाची आस लावुन बसलेली होती. बहीण गावभर आनंदाने सांगत होती. माझा दादा येतोय बरं..! अखेर तो दिवस उजळला. घरं सजवलेलं होत. स्वागताची तयारी झाली. सगळ्यांच्या नजरा येणाऱ्या वाटेवर खिळल्या होत्या. येणारा जाणारा प्रत्येक जण विचारत होता. कधी येणार मेजर ? अशातच काही गाड्यांचा ताफा घरासमोर येवुन थांबला. काही कळत नव्हतं ह्या गाड्या आपल्या घरासमोर कशाला आल्या असतील? एवढ्यातच एक लाकडी पेटी घेवुन चार सैनिक एका गाडीमधुन खाली उतरले पण त्यामध्ये आई-वडिलांना आपला मुलगा मात्र कुठेच दिसत नव्हता. आता मात्र काळजाची धडधड वाढत होती. सैनिकांनी ती पेटी खाली ठेवली. तीच तोंड उघडलं. आईवडिलांनी आतमध्ये डोकावुन पाहिलं. तर तिरंग्यामध्ये त्यांच्या काळजाचा तुकडा होता. ते दृश्य पाहताच जन्मदाते जमिनीवर कोसळले. पत्नीला हे काय झालंय काहीच कळत नव्हतं. बहीण भावाकडे नुसती एकटक पाहते आहे. अशातच छोटीशी चिमुकली तिच्या आईला विचारते. आई काय झालं ग बाबांना ? काय परिस्थिती असेल ..!
जगाच्या पाठीवर दोन व्यक्तींचा आदर नक्कीच व्हायला पाहिजे. पहिला देशाच्या सीमांच रक्षण करणारा जवान आणि जगाला पोसणारा शेतकरी ...
- पण काय आहेत शेतकऱ्याच्या व्यथा . नक्की वाचा
- माझा बाप शेतकरी ...
आज अशे जवान सीमेवर तैनात आहेत म्हणुन तुम्ही-आम्ही सुखाचा श्वास घेतोय .
समाप्त-
©® प्रतिक महल्ले
Photo Credit - Pixabay
1 Comments
खूप छान दादा
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा