आज तुम्ही आम्ही एकविसाव्या शतकात जगतोय ... एकीकडे स्त्री-पुरुष समानतेचे गोडवे गायले जात असतांना दुसरीकडे मात्र या मानवी समाजात मुलगा जन्माला आला तर आनंदाने मिठाई आणि मुलगी जन्माला आली तर संकुचतेने आजही जिलबीच वाटली जाते . म्हणजे इथं बदलत्या काळानुसार फक्त इमारतींची उंची वाढली मात्र विचारांची उंची अजुनही वाढलेली नाही.
चुलीपासुन सुरू झालेला स्त्रीचा प्रवास आज दिल्लीपर्यंत येवुन पोहचलेला आहे . प्रत्येक क्षेत्रात स्त्री अग्रेसर आहे . शिपायापासुन तर देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत स्त्रीने आपलं कर्तृत्व सिद्ध केलेल आहे . म्हणजे येणारा काळ हा स्त्रियांचा आहे हे अटळ आहे परंतु तीचा आजही कमी प्रमाणात असेल पण या मानवी समाजाला विटाळ आहे . याची सुरुवात होते मुलींच्या जन्मापासुनच ... बाळाच्या जन्माआधी नऊ महिने असंख्य स्वप्न रंगवली जातात . बाळाला कोणी वागवायचं? त्याच्या बरोबर कोणी खेळायचं? आस लागलेली असते वंशाच्या दिव्याची पण जेव्हा वंशाच्या दिव्याऐवजी त्या दिव्याला प्राज्वलित ठेवणारी वात जन्म घेते तेव्हा मात्र ही सगळी स्वप्न भंगुन जातात . का? कुणास ठावुक.. आजपर्यंत ताठ असणारी नाकं आपोआप मुरगळली जातात. कित्येक कळ्या तर जन्माला येण्याआधी आईच्या गर्भातच खुडल्या जातात . जणु मुलगी म्हणजे शाप आहे.
मला मान्य आहे आता बदलत्या युगात मानसिकता सुद्धा बदलत आहे. परंतु दुर्गेची मनोभावे भक्ती करणाऱ्या या मानवी समाजात काही घरातील दुर्गा मात्र अजुनही आदर नावाच्या भक्तीपासुन वंचितच आहेत . प्रत्येक वेळेला मुलीला तू मुलगी आहेस हे तिच्या मनावरती बिंबवलं जात. मुलगी ओरडली तर तमाशा करत आहे आणि रडली तर दुसरं काहीच सुचत नाही हिला राडण्याशिवाय... रडूनच पोट भरत हिचं.. असं आपण किती सहजपणे बोलतो. नाही का? पण मुलीचा जन्म काय असतो हे पुरुषी अहंकारामुळे नाही कळणार आपल्याला कारण संत तुकारामांचा एक फार छान अभंग आहे की ' पाण्यातला मासा झोप घेतो कैसा , जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे '
एक साधं उदाहरण आहे . घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची , दोन वेळच्या अन्नाची सुद्धा सोय नाही. अशातच घरी पाहुणे आले . आई लगेच मुलाला आवाज देते . बाळा इकडे ये , आपल्या घरी पाहुणे आलेत... चहा करायचा आहे . दुध आणतोस का ? मुलगा लगेच तावातावाने बोलायला लागतो . जा ग मी नाही आणत.! मग आई म्हणते आन न बाळा तुला पण एक रुपया देते. एक रुपयाच्या आमिषाने मुलगा दुध आणायला तयार होतो. आई पदराला बांधलेली गाठ सोडते तसा मुलगा ओरडायला लागतो आई दे ना लवकर.. आई त्या गाठीमधुन सांभाळुन ठेवलेली चिल्लर काढत मुलाच्या हातावर ठेवते. मुलगा एका हातामध्ये पैसे घेतो दुसऱ्या हातामध्ये ग्लास घेतो आणि पाहुण्यांसमोरून दुध आणायला जातो पण सरळ जात नाही. जातांना त्या पैशांनी तो ग्लास वाजवत नेतो. म्हणजे जणु तो पाहुण्यांना सांगत असतो की आमच्या घरची गरिबी काय आहे? पण विचार करा त्या जागी मुलगी असली तर... आई आवाज देते. बाळा , घरी पाहुणे आलेत चहासाठी दुध आणतेस का? मुलगी पळतच येते. हो गं आई आणते ना.. आई पदराला बांधलेली गाठ सोडते. मुलगी पाहते की किती दिवस झाले आईने हे पैसे सांभाळुन ठेवलेले आहेत. आई ती सांभाळुन ठेवलेली चिल्लर काढत मुलीच्या हातावर ठेवते. मुलगी एका हातामध्ये ते पैसे घेते दुसऱ्या हातामध्ये ग्लास घेते.. पाहुण्यांसमोरून दुध आणायला जाते पण जातांना आईने दिलेले पैसे आणि ग्लास आपल्या फ्रॉकमध्ये झाकुन नेते. पाहुण्यांनाही कडु देत नाही की आमच्या घरची गरीबी काय आहे. म्हणजे माय-बापाची गरीबी झाकण्याच काम मुलगी करते .
पण दुर्दैवाने आजही कित्येक मुलींना ' शिकुन कायं मोठी क्लेकटर होणार ... शेवटी दुसऱ्याचचं धन ' असं म्हणत शिक्षणापासुन वंचित ठेवल्या जातं. आजही या देशातील राजकारणाची सगळी सुत्र महिलांच्या हाती असतांना ' तुला काय समजते गं ' एवढं एकच वाक्य बोलुन सर्व कारभार मात्र पुरुष पाहतात. थोडं तीन स्वतःच्या मनाने जगत पुढे जायचं म्हटलं तर तिची दामिनी होते . कोपर्डी सारख्या कित्येक श्रद्धांचे श्राद्ध इथे रोजच पार पाडतात. प्रत्येक मुलाला लग्नासाठी मुलगी सुंदरच पाहिजे मात्र तुला मुलगा कसा हवा ? हा प्रश्न मुलींना कधीच विचारल्या जात नाही . मग सुरू होतो स्वतःच मन मारून जगण्याचा प्रवास... मरेपर्यंत.
हे सगळं काही लिहीत असतांना मला माझीचं एक रचना आठवली. तीला कविता म्हणता येईल की नाही मला माहिती नाही. परंतु मी ऐकलेलं , पाहिलेलं, अनुभवलेलं शब्दात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. एवढं मात्र नक्की..
शीर्षक :- ' बाबा सांगा ना काय केला मी गुन्हा '
अठरा वर्षांपुर्वी तीने मुलगी म्हणुन जन्म घेतला , अन तिच्या बापाच्या काळजाचा ठोका चुकला...
घरात हवा होता तो वंशाचा दिवा , पण या सटविन एका अवदसेला जन्म दिला असं म्हणत बापानं तिच्या मायशीही अबोला घेतला...
आपणही डॉक्टर , वकील, इंजिनिअर व्हावं ... यशाच्या गगनामध्ये उंच उडावं हे तीच स्वप्न होतं, मात्र मुलीनं नेहमी मर्यादेतच राहावं हे बापाचं टोमण होत...
मायच्या मायेवाचुन आणि बापाच्या छत्रछायेवाचुन जगणारी ही पोरं आपली स्वप्न रंगवायला लागली , मात्र वाढत्या वयाबरोबर या समाजातील लुचाट कुत्र्यांची नजर तिच्यावरती भंगायला लागली...
कसायाच्या दावणीला गाय बांधावी तस तीला एका असुराच्या गळ्यात बांधल्या गेलं , उगाचं डोक्याले ताप नको असं म्हणत बापानही घाईत सगळं उरकुन मोकळं केलं..
आता आपलं सगळं मन मारून ती जगते आहे , स्वतःसाठी नाही तर आपल्या चिल्या-पिल्यासाठी राब-राब राबते आहे ...
अशीच एखादया वेळेला जुन्या आठवणी काढत बसते , आणि आपल्या फुटक्या नशिबाला मनातल्या मनातचं कोसते...
पाणावलेल्या डोळ्यांमध्ये कधी-कधी जन्मदात्याचं चित्र साकारते , आणि प्रत्येक वेळेला ती एकचं प्रश्न विचारते...
बाबा सांगा ना ... काय केला मी गुन्हा , माझ्याचं वाट्याला का हा दुःखाचा वनवास पुन्हा-पुन्हा...
समाप्त -
©® प्रतिक महल्ले
Photo Credit - Pexel
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा