एक होते निळूभाऊ

             निळकंठ कृष्णाजी फुले

                           सिने कलावंत
                                                                      

                 जन्मदिनांक :  १६ मे १९३0
                 मृत्युदिनांक  : १३ जुलै २००९
                 जन्मस्थळ   :  खडकमाळ , अलीबाग (पुुणे)
                 मृत्युस्थळ   :  पुणे

भिनेत्याचा मुलगा जर अभिनेता होत असेल तर यामध्ये काहीच नवल नाही परंतु एका सामान्य कुटुंबातील मुलगा जर अभिनेता बनून करोडो लोकांच्या गळ्यातील ताईत बनत असेल तर ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. ही गाथा आहे अश्याच एका भाजीपाला विक्रेत्याच्या मुलाची.. एका हाडाच्या कलाकाराची..

१६ मे १९३० पुण्यातील खडकमाळ अलीबागमध्ये एका मुलाचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची.. वडील लोखंड आणि भाजीपाला विकून घरचा सगळा प्रपंच चालवत असत. लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड असणाऱ्या त्या मुलाने मॅट्रिकपर्यंत शिक्षण पुर्ण केले आणि राष्ट्रसेवा दलाच्या काळापथकामध्ये काम सुरू केले. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर तो मुलगा अनेकांची मन जिंकू लागला. लोकांची मन तर जिंकता येत होती पण भाकरीचं काय ? त्यासाठी तो मुलगा माळीकाम करू लागला.

पण माणसाला ज्या गोष्टीची ओढ असते ती गोष्ट कधीच सुटत नाही. माळीकामासोबतच कलापथक सादर करता-करता त्या कलाकाराने वयाची तिशी ओलांडली. स्वतःच्या अभिनयाचा कस आणि रसिकांच्या मनाची नस ओळखणारा हा कलावंत हळूहळू लोकप्रिय होवू लागला. 'पुढारी पाहिजे' या वगनाट्यातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. आणि सन १९६८ साली 'एक गावं बारा भानगडी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्या कलाकाराने मराठी चित्रपटसृष्टीतं पाऊलं ठेवले. त्या चित्रपटातील 'झेलेअण्णा' ही व्यक्तिरेखा आजही आठवते. ही व्यक्तिरेखा रसिकांसमोर जिवंत करणाऱ्या त्या कलाकाराचं नावं होतं निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजेचं निळू फुले ( निळूभाऊ ) 

सन १९७२ मध्ये आलेल्या 'सखाराम बाईंडर' या नाटकातील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. ज्या भूमिकेचे कौतुक त्या वेळेला जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी सुद्धा केले होते. त्या नाटकापासून सुरू झालेला निळूभाऊंचा अभिनय प्रवास अखंड सुरूच राहिला. 'सिंहासन' चित्रपटातील पत्रकार दिगू टिपणीस असेल किंवा 'सामना' चित्रपटातील खलनायक हिंदूराव, १९७८ साली आलेल्या 'आयत्या बिळावर नागोबा' मधील भुजगंराव असेल किंवा १९८३ साली आलेल्या 'वो सात दिन' या हिंदी चित्रपटातील नानाजी ची भूमिका.. प्रत्येक भूमिका जगणारा हा अवलिया रसिकांच्या काळजात अजरामर झाला.

सतत ४० वर्ष रंगभूमी व चित्रपटसृष्टी गाजवत १२ हिंदी व जवळपास १३५ हून अधिक मराठी भाषिक चित्रपट गाजवणारा , नायक व खलनायक अशा दोन्ही भूमिका लीलया पेलणारा हा कलावंत १३ जुलै २००९ रोजी आपल्यातून निघुन गेला. पण साधं 'बाई वाड्यावर या' हा डायलॉग जरी पाहला किंवा कानावर पडला तरी कित्येक लोकं त्यांना स्त्रीलंपट माणूस समजतात. ही ताकद आहे निळू फुले यांच्या कसदार अभिनयाची... असा नट होणे नाही.

समाप्त.


- ©® प्रतिक गणेश महल्ले 

फोटो श्रेय - साभार गूगल