भारत माझा देश आहे

जगाच्या पाठीवरचा असा एकमेव देश जिथं अनेक जाती , धर्म , पंथांची लोकं एकत्र राहतात. जगाच्या पाठीवरचा असा एकमेव देश ज्या देशाची संस्कृती जगासमोर आदर्श म्हणून अभिमानाने उभी आहे. जगाच्या पाठीवरचा असा एकमेव देश ज्या देशातील लोकशाही आजही सुखाने नांदते आहे. जगाच्या पाठीवरचा असा एकमेव देश ज्या देशाच्या संस्काराचे गोडवे जग आजही गाते आहे..

हा देश आहे संत परंपरेचा वारसा असणारा , हा देश आहे महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारा , हा देश आहे झाडे ,  नद्या , पर्वत नैसर्गिक समृद्धतेने भरलेला , हा देश आहे कलेच माहेरघरं बनलेला , हा देश आहे जगाला प्रेम शिकवणारा , हा देश आहे अभिमानाने आपला इतिहास जपणारा..

मी त्या देशाविषयी बोलतोय ज्या देशाने जगाच्या तोंडून हिंसा नाही तर अहिंसाच वदवली , मी त्या देशाविषयी बोलतोय ज्या देशाने शांततेच्या मार्गाने जगात क्रांती घडवली. मी त्या देशाविषयी बोलतोय ज्या देशाने भलेही गरिबीचं अनुभवली पण गरीब असूनही जगाला मात्र मनाची श्रीमंती दाखवून नेहमी माणुसकीच शिकवली.. मी त्या देशाविषयी बोलतोय ज्या देशाने जगाला शून्याची देणगी दिली. आणि शून्याच एक वैशिष्ट्य आहे त्याची स्वतःची किंमत भलेही काही नसेल परंतु तो ज्या संख्येच्या पाठीमागे उभा राहतो त्या संख्येची किंमत मात्र वाढते. मी बोलतोय अशाच एका देशाबद्दल..

होय मी बोलतोय या भारत देशाबद्दल...ज्या देशाचा मी नागरिक आहे आणि मला गर्व आहे की , भारत माझा देश आहे.


समाप्त.



- ©® प्रतिक गणेश महल्ले 


Photo Credit - Pexel