पत्र लिहण्यास कारण की , खुप दिवसांपासुन तुला काही सांगायच आहे. परंतु तू समोर असतांना कधीच भावना व्यक्त करता आल्या नाहीत. त्याकरिता हा सगळा प्रपंच....
जरी तू मला जन्म दिला नसेल तरी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी आईनंतर तूच आहेस. जणु माझी दुसरी आईच... तुझं आणि माझं नात म्हणजे कधीच न संपणारा अथांग समुद्रच.
ताई आठवते ना तुला , लहानपणी आपण खुप भांडायचो. हे माझं , हे तुझं ... पण माझं-तुझं असलं तरी थोड्या वेळात सगळं आपलंच असायचं. अस म्हणतात भांडणाने माणसं दुरावतात पण आपण दोघे याला अपवादच. नाही का ? कारण आपल्या भांडणातच आपलं प्रेम दडलेलं होत. तुला खाऊ मिळाला तर त्यामधला अर्धा वाटा तु मला देत होतीस. एखाद्या वेळेला बाबांनी तुला कपडे आणले की माझ्या मनात इर्षा निर्माण व्हायची पण तू मात्र माझी इर्षा कधीच केली नाहीस.
त्या दिवशी नकळत माझी नजर आपल्या जुन्या फोटोंवर पडली आणि काही आठवणी ताज्या झाल्या. मला आजही आठवते लहानपणी एखाद्या वेळेस रक्षाबंधनाला तुझ्या आरतीत टाकायला सुद्धा माझ्याकडे पैसे नसायचे गं .... पण बहिणीला कुठं पैसे देतात का ? नको मला, कमवायला लागला की मग साडी घेत जा! अस म्हणुन तू मला कधीच कमीपणा जाणवू दिला नाहीस. खरचं कीती ग्रेट आहेस न तू ....
तुला बहीण म्हणावं की मैत्रीण हेच कळत नाही. कारण एखाद्या वेळेस आई-बाबा माझ्यावर रागावले तर त्या वेळेस तूच माझी ढाल झालीस. म्हणतात ना एखाद्या व्यक्तीची किंमत ती व्यक्ती दुर गेल्यानंतरच कळते. खरं आहे ... तुझं लग्न जुडलं तेव्हा ' बरी कटकट निघुन जाते ' असं म्हणुन मी तुला खूप चिडवायचो. पण ताई , एखादी चिमणी जेव्हा तीचा खोपा सोडुन निघुन जाते आणि रोज चालणारी किलबिल बंद होते तेव्हा त्या खोप्याकडे बघवत सुद्धा नाही. अगदि तसचं तुझ्याविना घरं खुप रीत रीत वाटते गं ... घरात तुझा विषय निघाल्याशिवाय अन्नाचा कण सुद्धा जात नाही. मला आता कळतंय खरंच तू किती महत्वाची व्यक्ती आहेस.
पण खरं सांगू आनंद या गोष्टीचा आहे की तू दुर असलीस तरी तुझ्या सासरी तू माहेरपेक्षाही आनंदी आहेस. सुखाने नांदते आहेस. एका भावाला यापेक्षा काय हवं ... अशीच आनंदी राहा.
तुझ्याबद्दल लिहावं तेवढं कमीच आहे. शेवटी फक्त एवढंच की मी फार भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली. प्रिय ताई मला तू खूप प्रिय आहेस.
- तुझाच भाऊ
- ©® प्रतिक महल्ले
Photo Credit - Pexel
4 Comments
Great dada👍👍👍
उत्तर द्याहटवावाह प्रतिक....👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम दादा
उत्तर द्याहटवाGreat 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा